अहमदनगर जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपले; प्रचंड पावसाने पिकांचे मोठे नुकसान!

ahmadnagar

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे.

त्यामुळे हवामान खात्याने देखील रेड अलर्ट जारी करत राज्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात देखील दमदार पाऊस होत असून बुधवार रात्री पासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे.

नगर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २८ मिलीमीटरची नोंद झाली आहे. काल सकाळीही पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली. नद्या, तलाव, धरणांमध्ये नव्या पाण्याची आवक सुरु झाली आहे. मुळा, भंडारदरा, सीना, घोड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसानंतर आठ दिवस विश्रांती मिळाली होती. बुधवारी शेवगाव, कर्जत, जामखेड, पाथर्डी तालुक्यात जोरदार अतीवृष्टी झाली. या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.

पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडू लागली आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. नुकसान झालेल्या भागात अजूनही कृषी विभागाचे अधिकारी फिरकले नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

बुधवारी सायंकाळपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरु झाला आहे. काल सकाळीही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झाली आहे.

गुरुवारी सकाळी भंडारदरा धरणातून ८१२ क्युसेक, निळवंडे धरणातून १६४० क्युसेक, गोदावरी नदीतून नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून ४०४, दौड पुलावरुन ११ हजार ८०, घोड धरणातून ४२००, मुळा धरणातून ९००, सीना धरणातून ११४२ क्युसेक ने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सीना नदीलाही पूर आला आहे. भीमा नदीला पूर आल्याने दौंड पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. हवामान खात्याने 17 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:-