अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर !

अहमदनगर जिल्हा बँक

अहमदनगर: यावर्षी कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांनतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

७ जानेवारीला जिल्हा बँकेची अंतिम मतदारयादी जाहीर करण्यात आली होती त्यावेळी निवडणूक प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक आहेर यांची नेमणूक करण्यात आली होती. तर आता निवडणुकासाठी 20 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 21 रोजी मतमोजणी होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी सांगितले.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी पुढील पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मृत आणि नवीन संस्था सभासदांच्या ठरावासाठी 18 जानेवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानंतर 19 जानेवारीपासून बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 19 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता अर्जांची छाननी होणार असून, 28 जानेवारी ते 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता चिन्हवाटप करण्यात येणारअसून, 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे.

सहकारी संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठित होत असतात याची अनेक उदाहरणे आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्हा बँक देखील अपवाद नाही. दरम्यान, जिल्हा बँक गेल्या अनेक वर्षांपासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली आहे. याच वेळी खासदार सुजय विखे यांनी, ‘जे बरोबर येतील, त्यांना घेऊन जाऊ,’ असे वक्तव्य केल्याने ही निवडणुक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या