कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर हल्ला करणाऱ्या चौघांना ५ वर्षांची शिक्षा

court १

टीम महाराष्ट्र देशा- कोपर्डी खटल्याच्या सुनावणीनंतर आरोपींवर जिल्हा कोर्टाच्या आवारात हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवबा संघटनेशी संबंधीत चौघांना पाच वर्षांची सक्तमजुरी जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली तसेच प्रत्येकी १९ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षाही ठोठावली. राजेंद्र जऱ्हाड (वय २१ वर्ष), बाबुराव वालेकर (वय ३०), अमोल खुणे (वय २५) आणि गणेश खुणे (वय २७) या चौघांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी मराठवाड्यातील शिवबा ग्रुपच्या चार जणांना अटक करण्यात आली होती. हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, शस्त्र प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१ एप्रिल २०१७ रोजीच्या नियमीत सुनावणीनंतर आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलूमे, संतोष भवाळ या तीन आरोपींना पोलीस कर्मचारी न्यायालयातील लॉकअपमधून बाहेर काढून सबजेल कारागृहात घेऊन जात असतानाच न्यायालयाच्या आवारात चौघे जण सत्तूर घेऊन आरोपींच्या दिशेने धावून आले. पोलीस बंदोबस्त जास्त असल्याने पोलिसांनी या चौघा जणांना ताब्यात घेतले. या चार आरोपींबरोबर झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी रवींद्र भास्कर टकले हे जखमी झाले होते. सहायक फौजदार विक्रम दशरथ भारती यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे व आर्म अक्ट कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या चौघा आरोपींविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

या खटल्यात सरकारतर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. हल्लेखोरांचा कोपर्डीतील आरोपींना मारण्याचाच उद्देश होता, अन्यथा जालवा व बीड येथील रहिवासी असलेल्यांचा नगरच्या जिल्हा न्यायालयात येण्याचा काहीच उद्देश नव्हता. कोपर्डीतील आरोपींना मारण्याचेच कटकारस्थान रचल्याने चौघे जण न्यायालयाच्या आवारात आले. नगरच्या कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे कोपर्डी बलात्कारप्रकरणातील जीव वाचला. न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही चौघांचे चित्रीकरण आढळले आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे करण्यात आला होता. हा युक्तिवाद ग्राह्य धरताना न्यायालयाने चारही आरोपींना दोषी ठरवले. या चौघांच्या शिक्षेवर बुधवारी न्यायालयाने निर्णय दिला.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...