fbpx

जयंत पाटलांसमोरच भिडले नगरमधील बडतर्फ केलेले नगरसेवक

टीम महारष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसने बडतर्फ केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादी भवनमध्ये बैठकीला उपस्थित असल्याच्या कारणावरून आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा युवकचे माजी अध्यक्ष किरण काळे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच वादावादी पहायला मिळाली. आणि विशेष म्हणजे ही वादावादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर झाली.

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनमध्ये दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे बैठक सुरू होती. या बैठकीला बडतर्फ केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ नगरसेवक देखील उपस्थित होते. त्यामुळे किरण काळे यांनी या बडतर्फ केलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला. यावरून बडतर्फ केलेले नगरसेवक म्हणजेच आ. संग्राम जगताप यांचे समर्थक आणि काळे यांच्यात जोरदार वाद झाला. बडतर्फ नगरसेवक हे आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक असल्याने ते बैठकीत आले आहेत, असे जगताप समर्थक सांगत होते. यालाही काळे यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे जोरदार वादावादी झाली.

विशेष म्हणजे कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच एकमेकांचे उणेदुणे काढले. बडतर्फ केलेले नगरसेवक हे आज पाटील यांना भेटून त्यांची बाजू मांडणार होते. त्यासाठीच ते राष्ट्रवादी भवनमध्ये आले होते.पण काळे आणि काळे समर्थकांनी त्यांच्या या उपस्थितीवर आक्षेप घेतला त्यामुळे दोन्ही समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली होती पण या वादाला आवरत घेण्यासाठी आ. अरुण जगताप यांना मध्यस्थी करावी लागली