जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दाखवली नगरकरांना आयुक्तपदाची ताकद

अहमदनगर / प्रशांत झावरे : अहमदनगर शहरातील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेचा कारभार गळचेपीपणाची भूमिका घेणाऱ्या काही अधिकाऱ्यांमुळे रटाळ झाला होता. पण आयुक्तपदाची प्रभारी सूत्रे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींकडे येताच त्यांनी धडाकेबाज निर्णयातून कामाला गती दिली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे बेशिस्तपणाने सुरू असलेला कारभार काही दिवसांतच सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. नवीन आयुक्त पाठवण्याऐवजी पुढील सहा महिने द्विवेदींकडेच कारभार ठेवावा, असा सूर अाता नगरकरांमधून अाळवला जात आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त घनश्याम मंगळे यांनी ९ मे रोजी आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सोपवला. मंगळे यांची मुंबईला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली. मंगळे यांच्याजागी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांची नियुक्ती झाली असली, तरी ते हजर झाले नाहीत. त्यामुळे मनपाच्या आयुक्तपदाचा भार जिल्हाधिकारी यांच्यावरच आहे. पदाची सूत्रे हाती येताच द्विवेदी यांनी कामाला सुरुवात केली. महापालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

दिग्गजांनी कोट्यवधी रुपयांचा कर थकवल्यानंतर मनपाने शास्तीमाफीचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यात सुमारे ३७ कोटी वसूल झाले. दुसऱ्या टप्प्यात शास्तीत ५० टक्के सवलत आहे. हा टप्पा संपल्यानंतर ११ जूनपासून थकबाकीदारांवर जप्तीच्या कारवाईचे आदेश द्विवेदी यांनी दिले आहेत. अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा नियमित आढावा घेण्यासही त्यांनी सुरुवात केली. विशेष म्हणजे बेशिस्तपणे उशिरा कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप कामकाजात असा झाला बदल आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीना नदीच्या पात्रातील अतिक्रमणेकाढून श्वास मोकळा करण्याचा निर्णय, पावसाळापूर्व रखडलेली ओढे व नालेसफाई सुरू करण्याचे आदेश, रस्त्यांचे पॅचिंग करण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढला आहे. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी अचानक रजिस्टर तपासणी केली. हजेरीसाठी बायोमेट्रिक व त्यावर कॅमेरे लावण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी अचानक सर्व विभागांची पाहणी केली. कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी दहा वाजताची असतानाही साडेदहापर्यंत गैरहजर असलेल्या सुमारे ५९ कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून एक दिवसाच्या पगार कपातीचीही तंबी दिली. शहरातून जाणाऱ्या सीना नदीपात्रात झालेल्या कच्च्या व पक्क्या अतिक्रमणांकडे आता द्विवेदी यांनी लक्ष केंद्रित केले आहे. नदीपात्रातील अतिक्रमणे हटवून नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी त्यांनी बैठक लावून पाटबंधारे विभाग, मोजणी कार्यालय, मनपाचा अतिक्रमण विभाग, महसूल खात्यातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सात दिवसांत अतिक्रमण काढून न घेतल्यास ती काढण्याचाही इशारा दिला आहे. या व्यतिरिक्त नालेसफाई, रस्ते पॅचिंग, कचरा प्रश्न त्यांनी काही दिवसांतच मार्गी लावण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

त्यांच्या कामाचा झपाटा पाहून त्यांच्याकडे आगामी काळातही आयुक्तपदाचा भार असावा, असा अाग्रह आता नगरकरांकडून होत आहे. माजी सभापती संजय गाडे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी तशी मागणी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली, तर सुहास मुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र देऊन द्विवेदींकडेच भार ठेवण्याची मागणी केली.

या आधीच्या आयुक्त व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हितसंबंधांसाठी पदाधिकाऱ्यांशी जुळवून घेतले. किंबहुना त्यांची हुजरेगिरीच केली. त्यामुळे नगरकरांचे न भरून येणारे नुकसान झाले. आता द्विवेदी यांनी अत्यंत कमी दिवसांत जे काम केले आहे, त्यामुळे नगरकरांना सुखद धक्का बसला आहे. खमकी भूमिका घेणारे अधिकारी अनेक वर्षांपासून नसल्याने मनपावर प्रशासक बसवण्याची मागणी करणारे नागरिकही आता द्विवेदीच्या कामाची पद्धत पाहून त्यांच्याकडे पदभार राहावा, यासाठी नगरकर मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत आहेत.

जिल्ह्याचे नाव बदनाम झाल्याने कोणीही अधिकारी नगरला यायला तयार नाही. मनपात आयुक्तपदावर येणारे अधिकारीही दीर्घ रजेवर गेले. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी धडाकेबाज कामाला सुरुवात केली. त्यांच्याकडेच सहा महिने आयुक्तपदाचा भार व प्रशासकाची सूत्र दिली, तर नगरकर चांगल्या शहरात राहण्याचा अनुभव घेतील, तसेच आतापर्यंत अनेक आयुक्त आले, पण जलदगतीने कामे करण्याचा निर्णय कोणीच घेतला नाही. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामाची चुणूक दाखवून धडाकेबाज कामाला सुरुवात केली. त्यामुळे सरकारने द्विवेदी यांच्याकडेच सहा महिने आयुक्तपदाचा पदभार ठेवावा अशी सर्वसामान्य नगरवासीयांची अपेक्षा आहे.

तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींनी जसे अधिकार वापरून काम सुरू केले, तसे काम यापूर्वीच्या आयुक्तांनी केले नाही. द्विवेदींनी अशीच खमकी भूमिका कायम ठेवली, तर नगरकर त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील असे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे म्हणाले. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फार काळ पदभार नको. पण जिल्हाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आता पुढील कालावधीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मनपाचे आयुक्त म्हणून नियुक्ती मिळावी. त्यांना जर तीन वर्षे शहरात काम करण्यास मिळाले, तर शहराचा चेहरामोहरा बदलून जाईल. असे गिरीश कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले आहे.

You might also like
Comments
Loading...