अहमदनगर जिल्ह्याच्या शिक्षकी राजकरणाला मिळणार नवी दिशा…?

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेभोवती अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे राजकारण फिरते हे जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहीत झालेले आहे. या राजकारणाने जिल्ह्याला नव्हे तर राज्याला कै. भा. दा. पाटील यांच्यासारखे कणखर नेतृत्व दिले. आजही त्यांचेच उदाहरण जिल्ह्यात नवीन पिढीच्या शिक्षकांना दिले जाते, मधल्या काळात एकही राज्यस्तरावर दबदबा निर्माण करेल असा नेता या जिल्ह्यात निर्माण झाला नाही. त्याचे कारण म्हणजे फोडाफोडीच्या आणि मानापानाच्या नाट्याने शिक्षकी राजकारणात फूट पडत गेली ती कायमचीच.

मात्र आता हे सर्व कुठेतरी थांबावं म्हणून सर्व तरुण शिक्षक वर्ग एका छताखाली येऊन जिल्ह्याला नवी दिशा देण्याच्या हालाचाली सुरू करताना दिसत आहे. साधारणपणे जिल्ह्यात असलेल्या मंडळांपैकी अनेक मंडळे ही या ना त्या कारणाने एकमेकांवर चिखलफेक करत पहिल्या मंडळातून फुटून नवीन मंडळे स्थापन करत सत्तेवर आल्याचे चित्र दिसते. सभासदांचे हित या गोंडस नावाखाली अनेकांनी नेतेपद भूषवले, राजकीय फायदे करून घेतले, मात्र सभासद आजही मागणी करणाराच ठरत आहे. त्याच्या मागण्यांना केराची टोपली दिसत आहे.

आजवर बँकेच्या सर्वसाधारण सभेने शिक्षक प्रतिमा अनेकदा मालिन झालेली आहे मात्र आता नव्या दमाच्या शिक्षकांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांचा हा गुण टाकून देत नव्या उमेदीने नवा पर्याय सभासदांसोर देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

दर पंचवार्षिकला केवळ सत्तेसाठी मंडळ बदलून सत्ता हातात घेणारे जिल्ह्यातील काही ठराविक नेते प्रामुख्याने दिसतात. तेच दरवेळी पुढील मंडळात दिसतात, त्यामुळे बाटली तीच लेबल वेगळे अशी सभासदांची स्थिती झालेली आहे. सभासदांसमोर सक्षम पर्याय नसल्याने दरवेळी यांनाच मते देऊन निवडून आणावे लागत असल्याने आता सभासद मतदान करू की नको अशा निर्णयापर्यंत आल्याचे या तरुण शिक्षकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे नेतृत्व करणारे सध्याचे हे सर्व नेते जिल्हाभर तालुकानिहाय भेटी घेऊन आपला निर्णय लवकरच जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. हक्काचे 2500 हुन अधिक सभासद मतदार सोबतीला असून जुन्या मंडळांवरचा विश्वास उडाल्याने आणि आता सर्व काही तरुणांच्या हाती दिले पाहिजे असे मत असणारे जिल्ह्यातील हजारो शिक्षक सभासद पाठीशी असल्याचे यातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन हे राज्यव्यापी संघटन असून ते राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मिळावी याकरिता राज्य स्तरावर लढा व संघर्ष उभा करीत आहे. यातील महत्वाचे पदाधिकारी बँकेच्या राजकारणात सक्रिय होणार असले तरी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन हे आपल्या पेंशन मिळवण्यासाठी कायम सर्वांना सोबत घेऊन संघर्ष करीत राहील, हे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत जिल्हास्तरीय नुकतीच बैठक पार पडल्याचे वृत्त असून या बैठकीला संघटनचे विश्वस्त बाजीराव मोढवे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ठोकळ, राज्यनेते योगेश थोरात, जिल्हा उच्चाधिकार अध्यक्ष केशव कोल्हे, कार्याध्यक्ष सचिन नाबगे, उच्चाधिकार नेते संगमनेर हुन शिवाजी आव्हाड, पाथर्डीहुन अमोल भंडारी, शेवगावहुन राज्याप्रतिनिधी मच्छिन्द्र भापकर, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल सोनवणे, जिल्हा सहकार्याध्यक्ष प्रतीक नेटके, सरचिटणीस भाऊसाहेब पाचारणे, जिल्हा नेते सतीश पटारे, संगमनेर तालुकाध्यक्ष निलेश हारदे, संगमनेर कोषाध्यक्ष विकास खेबडे, नगर तालुक्यातून अरविंद थोरात, जिल्हा सल्लागार नाना गाढवे, पारनेर तालूकाध्यक्ष बाबासाहेब धरम, पारनेर शिलेदार दादा वाघ, कर्जत तालुकाध्यक्ष विनोद देशमुख, जामखेड माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र कदम, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भाऊ गिरमकर, अकोले शिलेदार सदानंद चव्हाण, नेवासा मधून नितीन दळवी, प्रकाश मुरकुटे, सुभाष भांड, सुरेश कवडे, कर्जत मधून योगेश खेडकर, नितीन पवार, पारनेर हुन वैभव पठारे, गणेश डेरे आदी शिलेदार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या