भाजपचा जाहीरनामा म्हणजे मी , माझा आणि माझा अहंकार अशा स्वरूपाचा : अहमद पटेल

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजपने विविध आश्वासने देत आपला ‘संकल्पपत्र’ नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये कृषीक्षेत्राला मध्यवर्ती ठेवण्यात आले असून संरक्षण , आणि अन्य विकास योजनांवर भाष्य केले आहे. मात्र या भाजपच्या जाहीरनाम्यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी टीका केली असून भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध करण्याऐवजी माफीनामा प्रसिद्ध करावा असा टोला लगावला आहे.

तसेच भाजपच्या जाहीरनाम्यावर फक्त नरेंद्र मोदी यांचेचं चित्र असल्याने हा जाहीरनामा मी , माझे आणि माझा अहंकार असा दर्शविणारा आहे असा टोला देखील अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. पुढे अहमद पटेल म्हणाले की, यंदाच्या निवडणुकीमध्ये खोटारडेपणा विरुद्ध न्याय अशी लढाई पाहायला मिळणार आहे.तर कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपच्या २०१४ च्या जाहीरनाम्यातील आश्वासने ही फलित शून्य असल्याचा दस्तऐवज देखील प्रसिद्ध केला आहे.

दरम्यान भाजपने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे, यामध्ये ६० वर्षावरील शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरु करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, तसेच शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डवर १ लाखांपर्यंतचे पाच वर्षासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल, असे संकल्पपत्रात नमूद करण्यात आलं आहे.