मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अहमद लंबूला अटक

वडसाळ : गुजरात एटीएसने 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असणारा आणि दाऊद इब्राहीमच्या अत्यंत विश्वासू लोकांपैकी एक असलेला दहशतवादी अहमद लंबूला वडसाळमधून अटक केली आहे. एटीएसने गुरूवारी रात्री एका विशेष मोहिमेअंतर्गत छापेमारी करून लंबूला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अहमद लंबूला पकडण्यासाठी लूक आऊट नोटिस जारी केली होती व इंटरपोललाही सूचना दिली होती. अहमद लंबूबद्दल माहिती देणाऱ्याला पाच लाख रूपयांचं बक्षिसही ठेवण्यात आलं होतं.

मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर मुस्तफा दोसानेचं अहमद लंबूला पळून जाण्यास मदत केली होती, असं बोललं जातं. 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये दोन तासाच्या आत 12 भीषण बॉम्बस्फोट झाले. या भीषण बॉम्बस्फोटात 257 लोकांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.