अहिल्यादेवी होळकर महामंडळाकडून पूरग्रस्तांना १० लाखांची मदत

टीम महाराष्ट्र देशा : सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. परंतु आता सरकारच्या मदतीमुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि कोकणामध्ये आलेल्या पुरामुळे वित्त व जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली होती. तेथील नागरिकांना देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार आज बाळासाहेब दोडतले यांनी १० लाख रुपयांचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी भाजपप्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते आदी उपस्थित होते.

दरम्यान, पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यात सचिन तेंडूलकर, अजिंक्य रहाणे, अक्षय कुमार, संतोष जुवेकर, सुबोध भावे, दिपाली सय्यद, रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर यांचा समावेश आहे.