जलयुक्त शिवार कामांचे जिओ टॅगिंग करा : जिल्हाधिकारी

अहमदनगर/प्रशांत झावरे : जलयुक्त शिवार अभियानातील सन २०१६-२०१७ मधील कामांचे जिओ टॅगिंग करण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी संबंधित यंत्रणांना दिले. त्याचबरोबर, सन २०१७-२०१८ मधील उर्वरित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज (गुरुवारी) जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर भोर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामनराव कदम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडीत लोणारे, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ति जमदाडे आदींची यावेळी उपस्थिती होती

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी तालुकानिहाय जलयुक्त शिवार अभियानातील विविध यंत्रणांच्या कामांचा आढावा घेतला. काही ठिकाणी कामे पूर्ण होऊनही जिओ टॅगिंग झाले नसल्याने राज्य पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही. ज्या यंत्रणांनी संबंधित कामे केली असतील, त्या यंत्रणांचीच जिओ टॅगिंगची जबाबदारी आहे. ते झाल्यानंतरच काम केल्यासंदर्भातील देयके अदा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिओ टॅंगिगची कामे गांभीर्याने घ्या अन्यथा ती कामांसंदर्भातील अनियमितता मानण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सध्या जलयुक्त शिवार अभियानातील सन २०१७-२०१८ मधील कामे पूर्ण करण्यासाठी केवळ दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर ही कामे पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे सर्व यंत्रणांनी याबाबत कामे या वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीनेच कार्यवाही करावी. याशिवाय, सन २०१८-२०१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे तयार करुनही त्याठिकाणी आवश्यक मंजुरी घेऊन कामे सुरु कऱण्यात यावीत, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

जिओ टॅंगिगसंदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दुरुस्त करुन घ्या. त्यासाठी पाठपुरावा करा. मात्र, यापुढे अन्य कोणतेही कारण चालणार नाही, याची सर्व यंत्रणांनी दखल घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. याशिवाय, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत ऑनलाईन आलेले अर्ज तसेच ऑफलाईन सादर झालेले अर्ज तात्काळ कार्यवाही करुन निकाली काढण्याची सूचना त्यांनी दिल्या. या योजनेतील मंजूर कामे तात्काळ सुरु झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...