दुध दरवाढीसाठी गुरुवारी परभणी जिल्ह्यात आंदोलन; रयत क्रांती संघटनेचा इशारा

परभणी: रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली दुध दरवाढीसाठी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारण्यात येणार आहे. राज्यात दुधाचे दर खाली आले असून शासनाने दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे दूध दरवाढीसाठी गुरूवारी म्हणजेच दि. १० जून रोजी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तसेच परभणी जिल्ह्यातही गुरूवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत गावाची चावडी, तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मधुकर आवचार यांनी दिली आहे.

राज्यात दररोज सुमारे सव्वा दोन कोटी लिटर दुधाचे संकलन केले जाते. दूध उद्योगाची रोजची उलाढाल सुमारे १०० कोटी रूपयांची आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या १ कोटी २० लाखांच्या घरात आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत दुधाचे दर १० ते १८ रुपयांनी खाली आले आहेत.वास्तविक पाहता शेतकऱ्यांना कोणत्याच शेतीमालाला उत्पादन खर्च भरून निघेल एवढेही किंमत मिळत नाही. तिच अवस्था दूध उत्पादकांची सुद्धा आहे. ऊसासारख्या पिकाला व इतर पिकांना एफआरपी व एमएसपीचा कायदा आहे. तसाच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कायदा हवा आहे.

राज्य सरकार दरवर्षी दुधाचा उत्पादन खर्च काढून किमती जाहीर करते. परंतु सदर किंमत कधीच शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे वेळोवेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावेच लागते. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी दूध, फळे, फुले, भाजीपाला, धान्य, कडधान्य मोठ्या कष्टाने देशाला पुरवले. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधाला ३० रुपये बाजारभाव मिळावा, अशी व्यवस्था करावी. यासाठी रयत क्रांती संघटनेने गुरुवारी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रयत क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष मधुकर आवचार यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP