आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना ; राज ठाकरे यांचं मार्मिक व्यंगचित्र

टीम महाराष्ट्र देशा – टेंभू ता. कराड येथील समाजसुधारक (कै.) गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी मोडतोड करून नुकसान केल्याची घटना शुक्रवार, दि. 18 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद युवराज भीमराव भोईटे यांनी कराड तालुका पोलिसात दिली असून याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टेंभू येथील आगरकर हायस्कूलच्या प्रांगणात आगरकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याची देखभाल दुरूस्ती आगरकर प्रतिष्ठान करते. शुक्रवारी सकाळी हायस्कूलमधील कर्मचाऱ्यास आगरकर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हायस्कूलचे मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. घडलेल्या प्रकाराबाबत अनेकांनी संताप व्यक्त केला.अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

दरम्यान याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक व्यंगचित्र रेखाटले आहे.टेंबू, कराड येथे आगरकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली या घटनेचा उल्लेख करत राज यांनी सदर व्यंगचित्र काढले असून त्यांनी सध्या देशाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांचा उल्लेख या व्यंगचित्रात केला आहे. आज जर काही लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचं म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! असा मथितार्थ असलेले व्यंगचित्र राज ठाकरे यांनी चितारले आहे.