अंगणवाड्यांसाठी निधी मिळावा – विश्वास देवकाते

पुणे : जिल्ह्यातील 500 अंगणवाड्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध असून या अंगणवाड्या बांधण्यासाठी 30 कोटी रुपयांची गरज आहे. त्यामुळे शासनाने हा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले असल्याची माहिती विश्‍वास देवकाते यांनी दिली.राज्य शासनाकडून एक अंगणवाडी बांधण्यासाठी जवळपास सहा लाख रुपये निधी दिला जातो.

मात्र, जागे अभावी अंगणवाडी बांधता येत नाही. इमारत नसल्यामुळे अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना समाजमंदिर आणि खासगी खोलीत बसावे लागते. काही गावांमध्ये अंगणवाड्या भाडेतत्त्वाच्या खोलीत भरतात. तर काही ठिकाणी अंगणवाड्या झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरविल्या जात आहेत. अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या बालकांना झाडाखाली किंवा ओट्यावर बसून शिक्षण व पोषण आहार घ्यावा लागत आहे.

पुर्वी नागरिक अंगणवाडयासाठी जागा देत होते. मात्र, सद्यस्थितीला जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे नागरिक अंगणवाड्यांसाठी जागा देत नाहीत. ग्रामपंचायतीच्या जागा गावाच्या बाहेर आहेत. अशा ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधता येत नाही. तसेच गावाच्या लगतच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत. यामुळे अंगणवाडयासाठी जागा मिळणे हा प्रश्‍न कठीण झाला आहे. नुकतेच महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार अंगणवाड्या बांधण्यासाठी 500 गावामध्ये जागा उपलब्ध असल्याचे समोर आले होते. या गावांमध्ये अंगणवाड्यासाठी निधी मिळावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती.

IMP