fbpx

मुख्यमंत्री होताच येडियुरप्पांनी केले पोलीस खात्यात बदल

बंगळुरू – कर्नाटक मध्ये सत्तासंघर्ष आता टोकाला पोहचला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.सुप्रीम कोर्टात रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर काल सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान येडियुरप्पा मुख्यमंत्री होताच त्यांनी काल शेतकऱ्यांची १ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेलता होता तर आज त्यांनी कायदा विभाग आणि पोलीस खात्यात काही महत्वाचे फेरबदल केले आहेत. येडियुरप्पा एकदिवसाचे मुख्यमंत्री ठरतील असे काँग्रेसने म्हटले असले तरी येडियुरप्पा सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.

येडियुरप्पांनी मधुसूदन आर नाईक यांच्याजागी प्रभुलिंगा के नवाडगी यांची कर्नाटकच्या अॅडव्हकोट जनरल पदावर नियुक्ती केली आहे. नवाडगी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल आहेत. सरकार स्थापनेसाठी येडियुरप्पांना निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना नवाडगी यांची अॅडव्हकोट जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

येडियुरप्पांनी पोलिसांच्या गुप्तचर विभागात महत्वपूर्ण बदल केले आहेत. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेत हा विभाग महत्वपूर्ण समजला जातो. रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमन कुमार पांडे यांना गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे. भाजपाच्या तीन आमदारांनी आधीचे काँग्रेस सरकार आपले फोन टॅप करत होते असा आरोप केल्यानंतर ही नवी नियुक्ती करण्यात आली असल्याची चर्चा आहे.

1 Comment

Click here to post a comment