पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबादेत सात हजार लसींचा साठा दाखल, लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी!

औरंगाबाद : महापालिकेला जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ७ हजार लसी मिळाल्या आहेत. त्यानुसार गुरुवारी शहरातील ३४ केंद्रांवर नागरिकांना केवळ दुसरा डोस मिळेल. तर पाच केंद्रांवर पहिल्या डोससाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. असे महापालिकेचा आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहेे त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन ऑफलाइन घोळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र शहरातील केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या आहेत.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. मात्र शासनाकडून लसींचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने वारंवार लसीकरणास ब्रेक लागत आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरात लसीकरण बंद होते. कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी प्रशासन करत आहे. १८ ते ४४ वर्षावरील नागरिकांचे गतीने लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मात्र दुसरीकडे लसीच मिळत नसल्याने आठवड्यातले एक-दोन दिवसच लसीकरण होत असून, उर्वरित दिवशी केंद्र बंद राहत आहेत. नागरिक लस कधी येणार? याची विचारणा करण्यासाठी केंद्रावर चकरा मारत असल्याचे चित्र आहे. मात्र लसींच्या कमी होणाऱ्या पुरवठ्यामुळे अनेकांना अजूनही पहिला डोस मिळालेला नाही. महापालिकेने दररोज १५ ते २० हजार लसीकरण करण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. मात्र तेवढा साठा मिळत नसल्याने निम्मे केंद्र बंदच आहेत. लसीकरण सुरळीत सुरु व्हावे यासाठी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP