तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जाधववाडीत होणार ‘वाहतूक नगर’, निविदा प्रक्रियेच्या हालचालींना वेग

औरंगाबाद: वीस वर्षांपासून रखडलेल्या वाहतूकनगरसाठी महापालिकेने अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात दहा एकर जागेवर वाहतूकनगर विकसित करण्यासाठी पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १६) कंत्राटदारांची निविदापूर्व बैठक घेण्यात आल्याचे शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सांगितले. शहर परिसराचा झपाट्याने विकास होत असल्याने व औद्योगिक वसाहतींमुळे जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

मात्र या जड वाहनांच्या पार्किंगसाठी अद्याप सुविधा नाही. त्यामुळे रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी खुल्या जागेत जड वाहने उभी केली जातात. २००१ मध्ये बाजार समितीकडून महापालिकेने वाहतूकनगरसाठी १० एकर जागा घेतली होती. या जागेचे २० लाख रुपयेही भरण्यात आले. २००७ मध्ये वाहतूकनगर उभारण्यासाठी एक कोटी रुपयांची निविदा काढून गट नंबर १६-१ व १६-२ मध्ये बांधकामही सुरू केले. पण हे बांधकाम बाजार समितीने अडविले.

महापालिकेची या जागेवर मालकी नाही, असे बाजार समितीचे म्हणणे होते. तेव्हापासून वाहतुकनगराचा प्रश्‍न प्रलंबित पडला. महापालिकेने केलेले अर्धवट बांधकामही पडून आहे. आता महापालिकेने वाहतूकनगर विकसित करण्यासाठी पीएमसीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. गुरुवारी इच्छुकांची बैठक घेण्यात आल्या. अनेक संस्थांनी तयारी दर्शविली असून, काही जण ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले होते, असे सखाराम पानझडे यांनी सांगितले.

आमदार जैस्वाल यांनी मांडला होता विषय

वाहतुकनगरविषयी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावर नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची हर्सुल परिसरातील जागेवर बाजार समितीचे आरक्षण असून, त्यात वाहतूकनगर हा एक भाग आहे. २५ एकर जागेवर वाहतूकनगर विकसित करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे, असे लेखी उत्तर दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP