अधिकाऱ्यांच्या लसीकरणानंतर शंका-कुशंका झाल्या दूर

औरंगाबाद : शहरात शनिवार (दि.१६) पासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. प्रत्येक केंद्रावर १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे टार्गेट ठरवण्यात आले आहे. मात्र प्रतिदिन केवळ ५० ते ६० टक्केच आरोग्य कर्मचारी कोरोना लसीकरणाचा लाभ घेण्यास समोर येत नसल्याचे दिसून येत होते. वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शुक्रवारी (दि.२२) दुपारी बारा वाजता धूत हॉस्पीटल येथील लसीकरण केंद्रावर पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्यासहित इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतली. आणि त्यानंतर दिवसभरात लसीकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले.

धूत हॉस्पिटल येथे औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर, जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ मुजीब सय्यद व इतर उच्चपदस्थ डॉक्टरांनी कोविड लस घेतली. मागील तीन दिवसाच्या लसीकरणात १५०० पैकी ९२५ कर्मचार्‍यांनी लस घेतली. मात्र आरोग्य सेवेतील प्रमुख अधिकार्‍यांनी शुक्रवारी लसीकरणास पुढाकार घेतल्याने दिवसभरात ५१६ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले.

विशेष म्हणजे धूत आणि एमजीएम रुग्णालयांनी लसीकरणामध्ये शुक्रवारी बाजी मारली. धूतमध्ये १५४ तर एमजीएममध्ये १६० लाभार्थ्यांनी लस घेतल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासून या मोहिमेत अडथळा येत आहे. कोव्हिन अ‍ॅपमध्ये बिघाड झाल्याने लाभार्थ्यांना निरोप पाठवता आले नाही. विशेष म्हणजे आजवर 101 कर्मचार्‍यांना रिअ‍ॅक्शन झाल्याने या धास्तीपोटी अनेक आरोग्य सेवकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.

पुढाकारानंतर सकारात्क प्रतिसाद
कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी सुमारे ७०० लाभार्थ्यांना निरोप पाठविण्यात आला होता. त्यास मागील तीन दिवसांच्या तुलनेत दिवसभरात चांगला प्रतिसाद दिसून आला. धूतमध्ये १५४ आणि एमजीएममध्ये 200 पैकी १६०, हेडगेवार ७४ याप्रमाणे लाभार्थ्यांनी लस घेतली. बजाजमध्ये ४१, मेडीकव्हर ४८, घाटीमध्ये ३९ या प्रमाणे लसीकरण झाल्याचे पालिकेने कळवले.

महत्वाच्या बातम्या