fbpx

‘चांद्रयान -2’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आज संपूर्ण देश गौरवशाली झाला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान 2’ चे आज श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण झाले आहे. दुपारी 2:43 वाजता ‘चांद्रयान 2’ झेपावले आहे. भारताच्या महत्वकांक्षी मोहिमेला अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता यशस्वीरित्या झालेल्या प्रक्षेपणानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे. तसेच देशाच्यावतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. चंद्रयान -2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आज संपूर्ण देश गौरवशाली आहे. मी थोड्या वेळापूर्वीच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांशी बोललो आणि त्यांना संपूर्ण देशाच्यावतीने अभिनंदन केले आहे. तसेच देशाच्यावतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे.

दरम्यान ‘चांद्रयान 2’ भारताची महत्वकांक्षी मोहिम आहे. या मोहिमेमध्ये ‘चांद्रयान 2’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास करणार आहे. तसेच सजीव सृष्टीस आवश्यक असणाऱ्या पाण्याचा देखील शोध घेणार आहे. उड्डाणानंतर मोहिमेचे १५ टप्पे असून त्यात ४५ दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या १५ मिनिटांत ‘चांद्रयान-२’ तेथील दक्षिण ध्रुवावर गिरक्या घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद अवतरण करील.