पानिपतानंतर मराठे पुन्हा उठले होते; दिवाकर रावते यांचे शेलारांना प्रत्युत्तर

नागपूर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या निकालानंतर आता भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांनी नव्या उमेदीने उभारी घेतली होती. अशीच उभारी शिवसेना घेईल आणि इतरांचे पानिपत करेल, असा टोला परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज येथे लगावला. भाजपचे आ. आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटला रावते यांनी प्रत्त्युत्तर दिले. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील निर्विवाद वर्चस्वानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनीही शिवसेनेसह विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मीरा-भाईंदरकरांनी `लबाडाघरचे आमंत्रण’ नाकारले. पारदर्शी विकासाची हमी देणा-या भाजपाचा दणदणीत विजय करून स्वीकारले, असे म्हणत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केले. या विजयाबद्दल आ. शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचेही अभिनंदन केले.

या संदर्भात नागपूर भेटीवर असलेल्या रावते यांना विचारले असता शेलार यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात १७६१ साली पानिपत येथे झालेल्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला होता. परंतु, त्यानंतर मराठ्यांनी पुन्हा उभारी घेऊन देश पादाक्रांत केला होता. या इतिहासाची शिवसेना पुनरावृत्ती करेल, अशा शब्दात रावते यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी संकटात असून शिवसेना त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तसेच शेतक-यांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांपूर्वी पत्र पाठवले असून ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत योग्य निर्णय घेतील, असा विश्वासही रावते यांनी व्यक्त केला.