शरद पवारांच्या आदेशानंतर अलिबागची जागा काँग्रेसला सोडू – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा – रायगड जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि काँग्रेस अशी आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी जागा वाटपातील मतभेद टोकाला जाऊ देणार नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा शब्द अंतीम राहिल. त्यांनी अलिबागची जागा काँग्रेससाठी सोडण्याचा आदेश दिला, तर तो पाळला जाईल अशी माहिती शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परीषदेत दिली.

अलिबाग येथील शेकाप कार्यालयात ही पत्रकार परीषद आयोजीत करण्यात आली होती. यावेळी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील उपस्थित होते.

जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने आमच्यासोबत यावे, यासाठी आम्ही प्रयत्न केले पण काँग्रेस नेत्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. तरीही जिल्हा नियोजन मंडळात आम्ही काँग्रेसला प्रतिनिधीत्व दिले. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्राप्त होणारा निधी दिला जात आहे. त्यामुळे आघाडीचा धर्म आम्ही पाळत आहोत, महाडचे पुढील आमदार माणिक जगताप असतील, त्यासाठी जे सहकार्य लागेल ते शेकाप आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

आपली राजकीय फसवणूक केल्याचा आरोप जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांकडून केला जातो. मात्र आपण कुणाचीही राजकीय कोंडी केली नसल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.