लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत होते. मार्च महिन्यात तर रुग्ण संख्येने उच्चांक गाठला होता. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी बससेवा बंद करण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली शहर बससेवा मंगळवारपासून (दि.८) रस्त्यावर उतरली असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मुख्य चालन व्यवस्थापक राम पवनीकर यांनी दिली. सकाळी ५:३० वाजता पहिली बस रांजणगाव मार्गावर धावली.

फेब्रुवारीत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अचानक उसळी मारली. मार्च महिन्यात तर जिल्ह्यात तब्बल ३२ हजार ३१३ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा ताण वाढला. कोविड केयर सेंटर वाढवण्यात आले. मात्र ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्सची मोठी समस्या निर्माण झाली होती. एप्रिलपर्यंत रुग्णसंख्येने ४१ हजारांचा आकडा पार केला होता. दररोज हजार ते बाराशे रुग्ण आढळून येण्याला एप्रिलच्या शेवटच्या आठवडयात ब्रेक लागला. सध्यस्थितीत शहरातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

त्यानुसार कालपासून शहर पूर्णत: अनलॉक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने मंगळवारपासून स्मार्ट सिटी बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. आज पहिल्याच दिवशी १६ बसेस पाच मार्गांवर धावल्या. पहिल्या टप्प्यात ३२ चालक-वाहक असे एकूण ६४ जण कार्यरत आहेत. रांजणगाव मार्गावर चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी दिली.

या मार्गांवर धावतेय स्मार्ट बस : पहिल्या टप्यात सिडको ते रेल्वे स्टेशन मार्गे – टीव्ही सेंटर, औरंगपुरा ते रांजणगाव मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक, औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगर मार्गे – महावीर चौक, सेव्हन हिल, सिडको ते घाणेगाव मार्गे – रांजणगाव, मायलन, सिडको ते जोगेश्वरी मार्गे – रांजणगाव या पाच मार्गांवर २४१ फेऱ्यामार्फत १६ बसेस बससेवा देतील.

महत्त्वाच्या बातम्या

IMP