सातारा-देवळाई नंतर आता हर्सूल, छावणी कोरोना हॉटस्पॉट

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून सातारा-देवळाई भागात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत. एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती बाधीत होत असल्याने हा भाग हॉटस्पॉट ठरला. त्यापाठोपाठच आता हर्सुल आणि छावणी हे दोन्ही परिसर देखील कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनत आहेत. हर्सुलमधील छत्रपतीनगरात आणि छावणीतील नेहरुरोड भागात कोरोनाचे अधिक रूग्ण आढळत आहेत.

औरंगाबाद शहरात मागील पाच दिवसांतच सहाशेपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबविण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, आता हर्सुल आणि छावणी भागात कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने आढळून येत आहेत.

या संदर्भात माहिती देताना पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात कोरोना रुग्णांचे पुन्हा हॉटस्पॉट बनत चालले आहेत. हर्सुलमधील छत्रपतीनगरात कोरोनाचे रुग्ण मोठया संख्येने निघत आहे. त्यासोबतच छावणी परिषदेतील नेहरुरोडवरील वसाहतीमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या पाच ते दहापेक्षा अधिक आढळून येत आहे.

त्यामुळे हे दोन्ही भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. या भागातील नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन डॉ. पाडळकर यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या