आठवलेंवरील हल्ल्याचे पुण्यात पडसाद, ‘आरपीआय’तर्फे रस्ता रोको आंदोलन

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर शनिवारी अंबरनाथ येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबेडकर पुतळा येथे रस्ता रोको करण्यात आला. जवळपास दीड तास रस्ता रोखून धरत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासह या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष परशुराम वाडेकर, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, हिमाली कांबळे, नीलेश आल्हाट, जगन्नाथ गायकवाड, रोहिदास गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, महिला आघाडीच्या प्रियदर्शिनी निकाळजे, किरण भालेराव यांच्यासह सर्व मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “अंबरनाथ येथे आठवले साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार निंदनीय असून, त्याचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आठवले साहेब सामान्य जनतेच्या अडचणी सोडवणारे नेते आहेत. वाढत्या लोकप्रियतेमुळेच आठवले साहेबांवर हल्ला झाला आहे. संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. तसेच आठवले साहेबांना पुरविण्यात येत असलेल्या सुरक्षेत हयगय करू नये. लोकनेता असलेल्या आठवले साहेबांवरील हल्ल्याचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये. शांततेच्या मार्गाने आपापल्या प्रभागात निषेध व्यक्त करावा.”

Loading...

बाळासाहेब जानराव म्हणाले, “आठवले साहेबांवर हल्ला केल्याने आंबेडकरी चळवळ थांबणार नाही. उलट त्यांचा झंजावात कैक पटीने वाढेल. आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल आसुया आहे. याच राजकीय भावनेतून हा हल्ला झाला असावा. पण विचारांचा सामना अशा पद्धतीने करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. कार्यकर्त्यांनीही आठवले साहेबांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नवीन माणसांना साहेबाना भेटवताना काळजी घ्यावी.”

परशुराम वाडेकर म्हणाले, “साहेबांना झालेल्या धक्काबुक्कीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आठवले साहेब लोकनेते आहेत. ते दलित, शोषित, आदिवासी जनतेच्या प्रश्नांवर लढणारे नेते आहेत. हा हल्ला प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशाने झाला आहे. त्यांना झेड सुरक्षा असताना तेथील पोलीस काय करत होते, हा प्रश्न आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे की, त्याची सखोल चौकशी करावी.”

महेश शिंदे म्हणाले, “झेड सुरक्षा असतानाही स्थानिक पोलीस का नसतात, हा प्रश्न आहे. शासनाने याची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी. अशा भ्याड हल्ला करणाऱ्यांना आमचे आव्हान आहे. दोन हात करायचे असतील, तर आमच्यासोबत करा. यापुढे आठवले साहेबांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना फोडून काढल्याशिवाय रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही.”

शशिकला वाघमारे, हिमाली कांबळे, अशोक कांबळे, रोहिदास गायकवाड, शैलेंश चव्हाण, जगन्नाथ गायकवाड, महिपाल वाघमारे यांनीही आठवले साहेबांच्या वरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आंदोलन समाप्त झाले.

औरंगाबाद हिंसाचार : उच्चस्तरीय समितीमार्फत घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश

3 Comments

Click here to post a comment