fbpx

मोदींनंतर आता राहुल गांधी-शरद पवार सोलापुरात

टीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम आता सर्वत्र सुरु आहे. येत्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष सताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आले आहेत. येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे दोघे बुधवारी सोलापुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

सोलापूरातून लोकसभेच्या जागेसाठी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव निश्चित झाले आहे. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी राहुल गांधी बुधवारी सोलापुरात येणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार देखील असणार आहेत.

याआधी नववर्षाच्या सुरवातीलाच म्हणजे ९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दौरा झाला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी विविध विकास कामांचे उद्घाटन केले. तर भाजप सरकार हे कॉंग्रेस सरकारपेक्षा विकास कामांबाबत नेहमीच अग्रेसर आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी सोलापुरात येऊन नरेंद्र मोदी यांना खोडून काढणार का यांकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.