पोलिसांच्या नोटिशीनंतरही संभाजी भिडे वारीत सहभागी होणारच !

टीम महाराष्ट्र देशा : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यातील फुलेनगर भागात आहेत. त्या पालखी सोहळ्यात संभाजी भिडेसुद्धा सहभागी होणार आहेत. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुण्यात दाखल झाले आहेत. संचेती पुलापासून ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. परंतु पोलिसांनी संभाजी भिडेंना पालखी सोहळ्यात सहभागी होऊ नये, यासाठी नोटीस बजावली आहे. मात्र भक्ती-शक्ती संगम करण्यासाठी संभाजी भिडे यांच्याबरोबर त्यांचे शेकडो अनुयायीही वारीत सहभागी होण्यावर ठाम आहेत.

संभाजी भिडे यांचे शेकडो अनुयायीही त्याच्याबरोबर पुण्यात उपस्थित आहेत. जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी धारकऱ्यांना  संबोधित केले. मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून ५०० पेक्षा अधिक स्वयंसेवक आले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा पालखी सोहळ्यातील संभाजी भिडेंच्या सहभागावरून वाद झाला होता. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीत वाद झाल्यानं शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, संजय जठार, पराशर मोने, रावसाहेब देसाई यांच्यासह जवळपास अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते.

दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावरून माऊलींची पालखी जात असताना संभाजी भिडेंचे कार्यकर्ते पालखीच्या सुरुवातीला येऊन चालू लागले. त्यावेळी त्यांच्या हातात तलवारीसुद्धा होत्या. या प्रकारावर दिंडीतल्या काही प्रमुखांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवले होते.