नाक दाबताच तोंड उघडले, पासवान यांच्या दबावतंत्रापुढे भाजप अखेर झुकले

टीम महाराष्ट्र देशा- बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांच्या वाटपात भाजपने म्हणावं तितके महत्व न दिलेल्या ‘लोकजनशक्ती पार्टी’चे नेते, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी आपल्या कब्जातील सहा जागा कायम राखल्या आहेत.बिहारमधील समसमान म्हणजे 20-20 जागा आपापसात वाटून घेतलेल्या भाजप आणि नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला प्रत्येकी तीन-तीन जागांचा त्याग पासवान यांच्यासाठी करावा लागला आहे.

पाच राज्यातील पराभवामुळे भाजप अडचणीत आल्याचं चित्र आहे. अनेक राजकीय पक्ष विविध कारणे पुढे करून एनडीएमधून बाहेर पडू लागले आहेत तर काही बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांच्या वाटपात भाजपने पासवान यांच्या पक्षाला दुय्यम स्थान दिले होते. अपमानास्पद वागणूक दिल्याने आणखी एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र अखेर बलाढ्य भाजपला आणि नितीशकुमार यांना पासवान यांच्या दबावतंत्रापुढे झुकावं लागलं आणि आपल्या कब्जातील सहा जागा कायम ठेवण्यात यश मिळालं आहे.

दरम्यान, यासंदर्भात केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे चिरंजीव आणि पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आज त्याबाबतचे ट्विट केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांबरोबर जागावाटपाची बोलणी झाली; मात्र त्यामध्ये ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर वेळेत तोडगा न निघाल्यास एनडीएचे मोठे नुकसान होऊ शकते असे सूचक ट्विट त्यांनी केले होते.