न्यूझीलंडनंतर आता ‘हा’ संघही रद्द करू शकतो पाकिस्तान दौरा 

ingla

नवी दिल्ली : न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका बसला आहे. आर्थिक नुकसानीसोबतच त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली गेली आहे. किवी संघ पाकिस्तानात गेल्यानंतर एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण दौरा रद्द केला. आता असे वृत्त आहे की इंग्लंडचा संघही पुढील दोन दिवसात पाकिस्तानच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहे. आता न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंड संघही या दौऱ्यातून माघार घेण्याच्या तयारीत दिसत आहे.

शुक्रवारी न्यूझीलंड संघाने पाकिस्तानविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेपूर्वी दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हे पाऊल उचलले. सुरक्षा धोक्यात असल्यामुळे दौरा रद्द करण्याचा कठीण निर्णय त्यांना घ्यावा लागला, असे मंडळाने म्हटले आहे. एकदिवसीय मालिकेनंतर लगेचच, संघ पाकिस्तानसोबत पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेत खेळणार होता.

आता ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानसोबत होणाऱ्या दोन टी -20 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघ खेळेल की नाही यावरही शंका निर्माण होत आहे. न्यूझीलंड संघाच्या दौऱ्यानंतर हा संघ पाकिस्तानला पोहोचणार होता. इंग्लंडचा संघ 2005 नंतर प्रथमच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडचा दौरा रद्द केल्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट मंडळही यावर विचार करत आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या वतीने असे म्हटले होते की, ‘सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा मागे घेण्याबाबत आम्हाला माहिती आहे. आमच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक टीम पाकिस्तानच्या मैदानावर आहे जी सध्या तेथील परिस्थिती पूर्णपणे समजून घेत आहे.’

पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर न्यूझीलंड संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होण्याआधीच आपल्या खेळाडूंना मैदानात न उतरवण्याचा निर्णय घेतला. आता इंग्लिश क्रिकेटला या दौऱ्याचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. ते म्हणाले, ‘पाकिस्तानला पाठवलेल्या संघाच्या सुरक्षेचे मूल्यांकन केल्यानंतर 24 ते 48 तासांनंतर या दौऱ्याला पुढे जायचे की नाही यावर ईसीबी बोर्ड निर्णय घेईल.’

महत्त्वाच्या बातम्या