नागपूरपाठोपाठ ठाणे येथे समृद्धी महामार्गासाठी थेट जमीन खरेदीस शुभारंभ

ठाणे : नागपूर जवळच्या हिंगणा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून थेट जमीन खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर काल दुपारी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांची खरेदी खते तयार करून जमीन विक्रीची किंमत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करणे सुरु झाले या खरेदी प्रक्रियेचा शुभारंभ आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येत नसून मी स्वत: या खात्याचा मंत्री आणि अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांशी बोलतोय असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, मी नागपूर येथेही शेतकऱ्यांना ते या विक्रीबाबत समाधानी आहेत का तसेच त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही याची सुरुवातीलाच खात्री केली. ठाण्यात देखील शेतकरी स्वखुशीने या महामार्गाला जमीन देण्यासाठी पुढे येत असून त्यांच्या बँक खात्यांवर पैसे जमा होत आहेत का ती मी खात्री करीत आहे.
पैसे थेट बँक खात्यात जमा
आज ज्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून खरेदी खते तयार करण्यात आली त्यांची खरेदी खते तसेच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते पालकमंत्र्यांनी तपासले. मौजे हिव( शहापूर) येथील गणपत दगडू धामणे यांची ७० गुंठे जमीन शासनाने खरेदी केली असून ७२ लाख ९१ हजार ७२४ रुपये मोबदला दिला आहे, मौजे हिव येथीलच दौलत शिवराम धानके यांच्या ८५ गुंठे जमिनीसाठी ७९ लाक ७ हजार २७० रुपये तर मौजे वाशाळा येथील गणेश पांडुरंग राउत यांच्या ४३ गुंठे जमिनीसाठी ३२ लाख १६ हजार ३०८ रुपये इतका मोबदला त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
आमच्यावर दबाव नाही
यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना या तीनही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले कि ते कुठल्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसून विक्रीसाठी कुठलाही दबाव त्यांच्यावर नाही.
५२ लाख रुपये ते ५ कोटी रुपये प्रती हेक्टर दर
शहापूर तालुक्यातील भूसंपादन होणाऱ्या २८ गावांपैकी २३ गावांतील जमीन विक्रीचे दर निश्चित करण्यात आले असून ही किंमत ५२ लाख रुपये ते ५ कोटी रुपये प्रती हेक्टर इतकी आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी पत्रकारांना दिली. ३२३ शेतकऱ्यांनी संमती दिली असून त्यांच्याशी पुढील व्यवहार सुरु आहे असे ते म्हणाले.
ठाणे जिल्ह्यातून जाणार्या ६८.५ किमी लांबीच्या या महामार्गासाठी भिवंडीमधील २५.५४ हेक्टर, शहापूर ४३४.३६ हेक्टर,आणि कल्याण १२२. ६२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असून एकूण खातेदार १ हजार ५४३ आणि भूधारक ८ हजार १७५ आहेत.
शहापूरमधील गावांसाठी २५ टक्के वाढीव दर पुढीलप्रमाणे( हेक्टरी)(कंसातील आकडेवारी बिनशेतीसाठी )
कसारा शेतजमीन प्रती हेक्टरी १ कोटी ६५ लाख ४३ हजार ६८० (बिनशेतीसाठी १८ कोटी ११ लाख ६४ हजार १८०), वाशाळा शेतजमीन प्रती हेक्टरी ७३ लाख ७५ हजार ५००  (बिनशेतीसाठी ६ कोटी ९० लाख), खर्डी शेतजमीन प्रती हेक्टरी ५ कोटी ८४ लाख ८५ हजार ९४० (बिनशेतीसाठी १२ कोटी ६० लाख ४ हजार ४४५), रातांधले शेतजमीन प्रती हेक्टरी १ कोटी १ लाख ४३ हजार  (बिनशेतीसाठी ८ कोटी १५ लाख) हिव शेतजमीन प्रती हेक्टरी ८५ लाख ७८ हजार  (बिनशेतीसाठी ६ कोटी ९० लाख), खुटघर शेतजमीन प्रती हेक्टरी १ कोटी ४४ लाख २२ हजार ६२५ (बिनशेतीसाठी ८ कोटी १५ लाख), रास शेतजमीन प्रती हेक्टरी ७३ लाख ७५ हजार ५०० (बिनशेतीसाठी ६ कोटी ९० लाख) अंदाड शेतजमीन प्रती हेक्टरी १ कोटी १ लाख ४३ हजार (बिनशेतीसाठी ८ कोटी १५ लाख)