‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली नव्या मोहिमेची घोषणा !

uddhav thakrey

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

पुणे, अमरावती, यवतमाळ, नाशिक अशा जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू केले जात असताना राज्याबाबत उद्धव ठाकरे काही महत्वाचा निर्णय घेणार का ? याकडे सामान्यांचं लक्ष्य लागलं होतं. पुन्हा लॉकडाऊन होणार का ? यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पुढील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रात दुसरी लाट आलीये का ? हे पुढच्या १० ते १५ दिवसांत समजेल. स्थानिक प्रशासनाकडे निर्णय सोपवले असून अचानक लॉकडाऊन केला जाणार नाही. पूर्वकल्पना दिली जाईल,’ असं सांगत जनतेमध्ये निर्माण झालेली भीती दूर केली आहे.

सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल, असं भाष्य देखील उद्धव ठाकरेंनी केलं आहे. तर, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानानंतर ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. आपण आपली जबाबदारी ओळखून वेळोवेळी हात धुणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे या मोहिमेत आपण स्वतः सर्वानी पाळायचं आहे, असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या