कोल्हापूरनंतर उस्मानाबादने मला जीवापाड प्रेम दिले-खा.छत्रपती संभाजीराजे

उस्मानाबाद : उस्मानाबाद हा माझा आवडता जिल्हा आहे. कोल्हापूरनंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला जीवापाड प्रेम दिले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचाही लोकप्रतिनिधी समजून खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकरांसोबत रखडलेल्या प्रश्नांवर काम करू, अशी ग्वाही खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली. उस्मानाबाद शहरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक विकासाची कामे होत असतानाच नवनवीन व्यवसाय रुजू पाहत आहेत. ही चांगली बाब आहे. तुळजापूरचे मटण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आपल्या भागात असलेल्या बाबींचे योग्य प्रकारे मार्केटिंग करून त्याचे व्यवसायात रूपांतर करण्याची गरज आहे. उस्मानाबाद शहरात चांगल्या दर्जाची हॉटेल्स सुरू होत असल्याने खवय्यांची सोय होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे अनेक प्रश्न खासदार म्हणून ओमराजे सभागृहात मांडत आहेत. त्यांनी शाश्वत पाण्यासाठी, उद्योगासाठी तसेच रेल्वेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे. त्यांची तळमळ मी नेहमी पाहतो. दिल्लीत ते हातात फायली घेऊन धावपळ करताना दिसतात.

येणाऱ्या काळात उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नासाठी त्यांना मी स्वतःनिश्चितपणे प्रयत्न करेन. लातूर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुका होता, १९८३ मध्ये स्वतंत्र जिल्हा होऊन, त्या जिल्ह्याचा चौफेर विकास झाला. उस्मानाबाद जिल्ह्याचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, छत्रपती संभाजी महाराज यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या