तिकीट कापल्यानंतर किरीट सोमय्या म्हणतात…

kirit somaya

टीम महाराष्ट्र देशा – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेकडून सातत्याने विरोध होत होता. या विरोधाची गंभीर दखल घेत भाजपने सोमय्या यांचा या मतदारसंघातून पत्ता कट केला आहे. आता ईशान्य मुंबईतून भाजप- सेनेचा उमेदवार म्हणून भाजपच्या मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्या यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.यावेळी किरीट सोमय्या यांनी मनोज कोटक हा डायनॅमिक उमेदवार असून, टॉप दहा निकालात त्यांचा निकाल असेल, असा विश्वास व्यक्त केला. आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे कोणावर नाराजी वैगरे नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, कोटक यांना उमेदवारी देण्यात आली असली तरीही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापासून दूरच राहणे पसंत केलं आहे. कोटक यांना आज सकाळी मुलुंड येथील सरदार प्रतापसिंह उद्यानात मॉर्निंग वॉक करत प्रचाराला सुरुवात केली. मात्र युतीचे अधिकृत उमेदवार असूनही शिवसेनेचे नेते किंवा कार्यकर्ते कोटक यांच्या प्रचारात गैरहजर होते.