फरार झाल्यानंतर सचिन पाटील नावाने वावरत होता किरण गोसावी – गुप्ता

फरार झाल्यानंतर सचिन पाटील नावाने वावरत होता किरण गोसावी – गुप्ता

amitabh gupta

पुणे : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर किरण गोसावीच्या चौकशीतून काय-काय गौप्यस्फोट होतात, यावर आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेत गोसावीच्या अटकेबाबत माहिती दिली आहे.“एका व्यक्तीला नोकरी देण्याच्या बहाण्याने मलेशिया येथे पाठवण्यात आले होते. त्यामध्ये त्या व्यक्तीची फसवणूक करण्यात आली त्या आधारावर २०१९ मध्ये यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला होता. किरण गोसावीला फरार घोषित करण्यात आले होते. त्यापूर्वी देशातील अनेक राज्यात सचिन पाटील नावाने फिरत होता. त्यानंतर आता गोसावीची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे,” असे अमिताभ गुप्ता यांनी म्हटले.

“फरार झाल्यानंतर किरण गोसावी सचिन पाटील या नावाने फिरत होता. सचिन पाटील या नावाने हॉटेलमध्ये राहत होता. स्टॉप क्राईम ऑर्गनायझेशन या संस्थेचा तो सदस्य असल्याचे त्याने सांगितले. या व्यतिरिक्त एका गुप्तहेर संस्थेचा सदस्य असल्याचे त्याने सांगितले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात निर्यातीचे काम किरण गोसावी करत होता,” अशी प्राथमिक माहिती त्याने दिल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. किरण गोसावीवर नोकरींच अमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. किरण गोसावीविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण गोसीवाचा शोध घेताना पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊतही पोहोचलं होतं. दरम्यान पुणे पोलिसांना अखेर किरण गोसावीला कात्रज येथील एका लॉजमधून अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या