साठ वर्षानंतरच इस्त्राईल भेट का ?

Pm modi israel
इस्त्राईल हे कधीच आपले मित्रराष्ट्र नव्हते. इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन देशांच्या वादामध्ये भारत कायम पॅलेस्टाईनच्या बाजूने उभा राहिलेला आहे. पॅलेस्टाईनचे दिवंगत नेते यासर अराफत यांच्याशी कायम भारताचे घनिष्ट संबंध राहिलेले आहेत.
 पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या अरब देशांची नाराजी नको तसेच अन्य राजकीय कारणांनी भारताने नेहमी अरब संस्कृती असलेल्या राष्ट्रांना जवळ केले आहे. पॅलेस्टाईन हे त्यापैकीच एक आणि इस्राईलचे शत्रूराष्ट्र म्हणून पॅलेस्टाईन ओळखले जाते. आता इस्त्राईल च्या बाबतीत सांगायचे तर इस्त्राईल हे बहुसंख्येने ज्यू लोकांचे राष्ट्र आहे. झरतृष्ट राजाचे जन्मस्थान म्हणजेच झोरॅष्ट्रियन संस्कृती असलेले  हे राज्य आहे. तसेच येसू ख्रिस्तांचा जन्मदेखील इथलाच आहे. या देशात अमेरिकन लोकांनीच ज्यू लोकांच्या वसाहती वसवल्या तसेच अमेरिकेतही ज्यू लोकं मोठ्या प्रमाणावर आहेत. स्वतः डोनाल्ड ट्रम्प हेदेखील ज्यू आहेत, ख्रिश्चन नाहीत.   त्यामुळे  इस्त्राईल या देशाला संपूर्ण जगात अमेरिका धार्जिणा देश आणि कट्टर इस्लाम ( अरब ) विरोधी देश म्हणून ओळखले जाते.
अमेरिकेने या देशाला सरंक्षण सामुग्रीसह बऱ्याच गोष्टींची मदत केलेली आहे, अजूनही करते आहे. इस्राईलचे आणि अमेरिकेचे अतिघनिष्ट संबंध हे इस्लामिक राष्ट्रांच्या डोळ्यात नेहमी खुपत असतात. इस्लाम सारख्या धर्माला इस्त्राईलने कसे दाबून टाकले याचे दाखले अँटी इस्लामिक लोकं कायम देत असतात. कट्टरपंथीय दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आणि जागतिक उपद्रव मूल्य असलेली अरब राष्ट्रे , तसेच पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीत त्यांच्यावरचे अवलंबित्व यासारख्या असंख्य कारणांमुळे भारताने आजवर अरब राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे परराष्ट्र धोरण स्वीकारलेले आहे. कट्टर इस्लाम विरोधी व अमेरिका धार्जिण्या इस्रायलशी मैत्री वाढवून आणि अरब राष्ट्रांची नाराजी पत्करून भारत दहशतवादासारख्या गंभीर समस्येला जवळ करू इच्छित नव्हता. त्यामुळे भारताच्या कोणत्याही पंतप्रधानाने इस्त्रायलला कधीच भेट दिली नाही. अगदी अटल बिहारी वाजपेयींनीसुद्धा ते टाळले. परंतु अँटी इस्लाम अशी सर्वसाधारण ओळख असलेल्या भाजपला इस्राईलसारखे राष्ट्र जवळ वाटू शकते म्हणून कि काय तेव्हा फक्त पहिल्यांदाच श्री. जसवंतसिंह परराष्ट्र मंत्री म्हणून इस्त्रायलला गेले होते. त्यानंतर कोणीही नाही.
 आता इस्त्राईलच्या दौऱ्यावर अनेक अरब राष्ट्रे नाराज असून, आयसिस सारख्या खतरनाक दहशतवादी संघटना प्रचंड नाराज आहेत. एव्हाना काश्मीर प्रश्नावर आत्तापर्यंत बाहेरचा कोणताही इस्लामिक देश टिप्पणी करत नव्हता. परंतु मध्यंतरी सर्व इस्लामिक राष्ट्रांनी एकत्र येऊन काश्मीर प्रश्न सोडवावा असे आवाहन इराणने केले होते. याचाच अर्थ इस्लामिक राष्ट्रांना कधी  नव्हे एवढा भारतात रस वाटू लागला आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबई वरील भीषण दहशतवादी हल्ला …या हल्ल्यात भारतीयांपेक्षाही ताज हॉटेलमधील ज्यू लोकं दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होते. तसेच ज्यूंचे असणारे छाबड हाऊस लक्ष केले गेले  होते. ज्यू आणि इस्लाम हे दोन्ही परस्परविरोधी टोक आहेत. अर्थात भारताने नेहमी दहशतवादाच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेलीच आहे. परंतु काश्मीर सारखा गंभीर प्रश्न झेलताना इस्लामिक राष्ट्रांचा आणखीन धोका नको म्हणून इस्राईलसारख्या इस्लामविरोधी कट्टर देशांना हेतुपुरस्सर दूर ठेवले होते. अमेरिकाधार्जिणा देश आणि कट्टर इस्लामविरोधी भूमिका यांमुळे इस्त्राईल कायम अरब राष्ट्रांच्या रडारवर आहेच. तसेच अमेरिकेशी वाढलेली आपली सलगी अरब राष्ट्रांना खुपत आहेच परंतु रशियासारख्या मित्रदेश देखील नाराज होत आहे. तिकडे चीनने प्रचंड कुरापत काढून भारतीय भूमीत आक्रमण सुरु केले आहे. अश्या वातावरणात इस्राईलसारख्या देशाला जवळ करून आणखीन काही देश भारतावर नाराज होऊ शकतात. तसेच दहशतवादी कारवाया वाढीच्या दृष्टीने पोषक वातावरण होऊ शकते. इस्त्राईलच्या अश्या जागतिक ओळखीमुळेच भारताने वाद नको म्हणून कायम इस्त्रायलला दूर ठेवले होते. परंतु जगावेगळे काहीतरी करून दाखविण्याच्या नादात आणि मुस्लिम विरोधी जागतिक नेता अशी स्वतःची (नको असलेली) ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याच्या धडपडीमुळे मोदींना इस्त्रायलला भेट देणे आवश्यक वाटले असावे. आधीचे राज्यकर्ते  मूर्ख नव्हते , नाहीतर त्यांनी इस्त्रायलला भेट दिली नसती का ? ….परंतु परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून इस्त्राईल कायम जवळही नाही आणि दूरही नाही. म्हणजेच आपुलकीही नाही आणि विरोधही नाही असे धोरण होते. परंतु ज्यू लोकांचा मोदीप्रणित सरकारला आता पुळका आल्यामुळे कारण नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम ( अरब ) राष्ट्रांचा रोष आपण पत्करला आहे असे वाटते. मोदींना सल्ला देण्याइतके कोणीही मोठे नाहीत , कारण ते सर्वज्ञानी महापुरुष आहेत. परंतु आम्हाला जेवढे आकलन झाले त्याबद्दल हा लेखनप्रपंच !
©चैतन्य पुरंदरे
( लेखकाच्या मताशी “महाराष्ट्र देशा ” सहमत असेलच असे नाही )
      तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा  संपर्क