धुळ्यात भाजप विरोधात अनिल गोटेंनी दंड थोपटले, २६ वर्षांनी घेतली शरद पवारांची भेट

मुद्रांक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांचा हात असल्याचा अनिल गोटे यांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नाराज आ अनिल गोटे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. तेलगी घोटाळ्यात गोटे यांनी पवारांना टार्गेट केले होते. मात्र आता दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, या म्हणीप्रमाणे धुळ्याचे भाजप खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधात दंड थोपटत गोटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे २६ वर्षानंतर प्रथमच गोटेंनी पवार यांची भेट घेतली.

आमदार अनिल गोटे हे मागील काही दिवसांपासुन भाजप नेत्यांवर नाराज आहेत, धुळे महानगरपालिका निवडणुकीत गोटे यांनी भाजप विरोधात आघाडी स्थापन करत निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री असणारे डॉ सुभाष भामरे यांचा पराभव करण्याची भीष्मप्रतिज्ञा अनिल गोटे यांनी केली आहे.

दरम्यान, अनिल गोटे हे भामरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे आघाडीने पाठिबा देण्याची मागणी  करत त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना  भामरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

खा भामरे यांनी धुळे मतदारसंघाची वाट लावली आहे. कोणत्याही विकासकामात १० टक्के कमिशन घेवून ते काम करतात. आजवर पैसे घेवून त्यांनी १८३ बदल्या केल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. तसेच भामरे यांचा पराभव करण्यासाठी कोणाशीही मैत्री करावी लागली तरी चालेल, म्हणत शरद पवार यांच्या भेटीचे समर्थन केले आहे.