१२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद विमानतळाला ‘हक्काचे’ पाणी! मनपाचे असहकार्य, एमआयडीसीचा मदतीचा हात

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला एमआयडीसीतर्फे दोन कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. यातून दररोज एक एमएलडी पाणी मिळणार आहे. गुरुवारी एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात जलपूजन करण्यात आले. मात्र यासाठी विमानतळाला दिर्घ प्रतिक्षा करावी लागली. पाणी पूजनाचा कार्यक्रम प्रविण कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते झाला.

आंतरराष्ट्रीय म्हणवणाऱ्या चिकलठाणा विमानतळाला गेल्या बारा वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते विमानतळाला एक लाख ७० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे त्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने २००७ पासून मनपाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र महापालिकेने पाणी देण्यासाठी तयारी दर्शविली नाही. विमानतळाला बोअर, खासगी टँकरचा आधार घ्यावा लागत होता. विमानतळ प्राधिकरणाने २००७ पासून २०१९ पर्यंत मनपाकडे पाठपुरावा करूनही पाणी मिळाले नाही.

मग विमानतळ निर्देशक डी. जी. साळवे यांनी १२ जून २०१९ रोजी एमआयडीसीकडे चार इंच व्यासाची वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव दिला होता. कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांनी १५ जुलै २०१९ रोजी योजनेच्या सर्व अटी, नियम, शर्ती पूर्ण करत २३७.५६ लाखांचे अंदाजपत्रक दिले होते. ९ आॅक्टोबर २०२० रोजी सहमती करार झाला. जल पूजनाला साळवे, सहायक व्यवस्थापक सुधीर जगदाळे, हर्षे, निवृत्त उपअभियंता दिलीप परळीकर, उपअभियंता गणेश मोईकर, सहायक अभियंता प्रशांत सरग, व्ही. ए. बनसोडे, शारदा इन्फोटेकचे निखिल कुलकर्णी उपस्थित होते. योजनेसाठी परिश्रम घेणारे सहायक अभियंता प्रशांत सरग, बनसोडे यांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP