नरेंद्र मोदी ट्रोल करणाऱ्यांची फौज चालवतात – प्रशांत भूषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मिडीयावर ट्रोल करणाऱ्यांची फौज चालवीत आहेत. देशात आजवर जे घडले नाही ते घडत आहे, त्यामुळे राज्यघटना धोक्यात आली असून लोकशाही संस्था उध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी केला आहे. न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी होऊ दिली जात नाही. तसेच मोदी सरकारच्या कार्यकाळात न्यायव्यवस्थेवर दबाव टाकला जात आहे. त्यामुळे न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन लोकशाही संकटात असल्याची खंत व्यक्त करावी लागत असल्याच ही प्रशांत भूषण म्हणाले.

स्वराज अभियानातर्फे आयोजित समता स्वराज शिबिराचे उद्घाटन केल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी स्वराज अभियानाचे सुभाष लोमटे, अविक साहनी, इब्राहिम खान, अण्णासाहेब खंदारे ललित बाबर आदी उपस्थित होते.

प्रशांत भूषण यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकारवर होत असलेल्या राफेल खरेदी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत राफेल विमानांच्या खरेदीत भ्रष्ट्राचार झाल्याचा घणाघाती आरोप केला ते म्हणाले कि, काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात १२६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी ५४ हजार कोटी रुपयांचा सौदा ठरला असताना संरक्षण मंत्रालय तसेच वायूसेनेला विश्वासात न घेता परस्पर केवळ ३६ राफेल विमाने कोणतीही निविदा न काढता तिप्पट दराने कशी खरेदी केली. यामध्ये बोफोर्सचा घोटाळा ६४ कोटींचा होता. मात्र, राफेल घोटाळा हा हजारो कोटींचा असून मोदी सरकार काँग्रेसपेक्षा अधिक भ्रष्टाचारी असल्याची टीका भूषण यांनी केली.