अन्वी, बहुली, सेलूद गावकऱ्यांचा कौतुकास्पद उपक्रम; दसऱ्याला आपट्याची पाने न तोडण्याचा केला निर्धार!

apta leafs

औरंगाबाद : अभिनव प्रतिष्ठानच्या मदतीने साकार झालेल्या राज्यातील एकमेव पर्यावरण गाव अर्थात इको व्हिलेज बनलेल्या बहुली या गावात सलग ३ वर्षांपासून आपट्याचे एक ही पान तोडले जात नाही. या गावाचा आदर्श आता अन्वी तसेच भोकरदन तालुक्यातील सेलूद येथे प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज व कुंभारी रामायनाचार्य संतोष महाराज आळवणे यांच्या सहयोगाने या गावांनीही नामशेष होत असलेला बहुगुणी, धार्मिक व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्व असलेला आपटा व शमी यांचे जतन, संवर्धन व रोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्ञानेश्वर माऊली यांनी या विषयावर कोठा जहागीर या गावी हरित कीर्तन सादर केले. दसऱ्याच्या पूर्व संध्येला अन्वी येथे आपटा व शमी यांचे रोपण करण्यात आले. या रोपांभोवती युवकांनी मानवी साखळी करून संरक्षण करण्याचा संदेश दिला आहे. संस्थेचे अध्यक्ष किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संतोष पाटील हे याबाबत या नवरात्रात जनजागृती करत होते. त्याचे हे फलित आहे. त्यांच्या संकल्पनेतून आपट्याचे अभिनव पान बनवण्यात आले. जाड कागदावर आपट्याच्या पानाच्या आकाराचे हिरवे पान व त्यावर आपटा व शमी यांचे महत्त्व नमूद केले असून ते एकच पान एकमेकांना भेट म्हणून दिले जात आहे.

त्यावर लिहिलेली माहिती वाचून ते साखळी पद्धतीने पूर्ण गावात प्रसारित होत आहे. या उपक्रमाचे राज्यभर कौतुक होत आहे. आपटा हा बहुगुणी औषधी वृक्ष असून त्याच्या मुळांवर नत्राच्या गाठी असतात. त्यातून निघणारे नत्र जमिनीची सुपीकता वाढवतात. पोटाच्या व मूत्रमार्गाच्या विकारात ही पाने उपयुक्त असून ही पाने या झाडाचे फुफ्फुस आहेत. पाने ही झाडांसाठी अन्न निर्मिती करतात. ऑक्सिजन वातावरणात सोडतात. सीओटूचे शोषण करून पर्यावरणाचा समतोल राखतात. ही या पानावर व या झाडाच्या फुलांवर मोठी अन्न साखळी आहे. ही पाने तोडल्याने समतोल बिघडतो अशी माहिती डॉ. संतोष पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या