fbpx

आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पदकांवर मोहोर

टीम महारष्ट्र देशा : महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांनी हैद्राबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राला उपविजेते पदाचा बहुमान मिळवून दिला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव अत्राम, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

तेलंगणा आदिवासी कल्याण निवासी शैक्षणिक संस्थेच्या (टीटीडब्ल्यूआरआयएस) गच्चीबावली स्टेडीयम, हैद्राबाद येथे 14 जानेवारी ते 16 जानेवारी 2019 दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारतातील अतिशय दुर्गम भागातील एकलव्य मॉडेल निवासी शाळांच्या 1 हजार 800 आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

आपल्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करुन राज्याला 29 पदकांची कमाई करून दिली. हॉकी, कुस्ती, व्हॉलीबॉल, हँडबॉल, फुटबॉल, कबड्डी, खोखो आणि ॲथलेटिक्स अशा खेळांचा समावेश या स्पर्धेत होता. एकूण 12 खेळ प्रकारांमध्ये महाराष्ट्रातील 204 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी 6 सुवर्ण, 13 रौप्य आणि 10 कांस्य पदक मिळवले आहे. हॉकी या स्पर्धेमध्ये पुरुष व महिला गटाने प्रत्येकी एक-एक सुवर्ण पदक व कुस्तीमध्ये 61 किलो गट, 43 किलो गट, 40 किलो गट व 38 किलो गट वजनी गटामध्ये प्रत्येकी एक असे एकूण 4 सुवर्ण पदके पटकाविली आहेत.

हे यश आहे, दुर्गम भागात खडतर परिस्थितीत विविध आव्हानांना सामोरे जात आपल्या खेळाप्रती श्रद्धा असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे. हाती काही साधन नाही, बड्या खेळ संस्थांचा पाठिंबा नाही, अमाप शुल्क भरून मिळणारे खेळाचे तांत्रिक प्रशिक्षण नाही अशा परिस्थितीत केवळ जिद्द आणि मेहनत यातील सातत्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना हे यश मिळाले आहे.

क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारोप प्रसंगी श्रीमती मनीषा वर्मा, प्रधान सचिव, ल.गो.ढोके, उपसचिव, किरण कुलकर्णी, आयुक्त,आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.