मला तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं त्यासाठी आशीर्वाद द्या : आदित्य ठाकरे

aaditya thakray

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आदित्य ठाकरे आज पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मला तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. तसेच बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र बनवायचा आहे, असे म्हणत उपस्थितांची मन जिंकण्याचा प्रयत्न केला.

आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्या टप्प्यातील तिसरा दिवस आहे. आज त्यांनी बोईसर येथील जनतेशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मी 92 मतदारसंघात फिरलो असून साधारण साडे पाच हजार किमी फिरलोय. लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो, निवडणुकीनंतर राजकीय भेदभाव ठेवायचा नसतो. आपल्याला मते न दिलेल्यांचेही काम करायची असतात, असे मला माझ्या वडिलांनी सांगितलंय. त्यामुळे मला सुजलांम सुफलाम महाराष्ट्र घडवायचाय, मला भगवा महाराष्ट्र घडवायचाय. मला तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचाय. तुमच्या स्वप्नांना मंत्रालयात स्थापन करायचं, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान आदित्य ठाकरे या विधानसभेला प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशी चर्चा आहे. त्या दृष्टीने शिवसेनेने मतदारसंघांची चाचपणी करायला देखील सुरवात केली आहे. तर या जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री असतील असा नारा शिवसेनेने दिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत युतीची सत्ता आली तर मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले जाणार असल्याच सांगितले जात आहे.