fbpx

ज्यांचे निवडणुकीत उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्व नसतं, राज ठाकरेंना पुतण्याचा टोला

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या धडाक्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेत्यांकडून खिल्ली उडवली जात असतानाच आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील आपल्या काकाला टोला मारला आहे. ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचार रॅली दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ही टोलेबाजी केली आहे.

ज्यांचे निवडणुकीत उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्व नसतं असं म्हणत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात भगवं माहोल आहे. जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ तिथे कमळ, लोक ही दोन बटनं सोडून दुसरी कोणतीही बटणं दाबत नसल्याचं मतं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केल आहे. तसेच जनतेला सत्ताधारी पक्षचं हवा असल्याचंही, आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान राज ठाकरे यांनी मुंबईतील काळाचौकी घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठ संकट आहेत. त्यामुळे या दोन माणसांना निवडून देऊ नका असे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. तर शिवसेनेलाही मतदान करू नका असे राज ठाकरे म्हणाले होते. त्याच पार्श्वभूमीवर आदित्य यांनी आज ही टोलेबाजी केली आहे. त्यामुळे आता आदित्य देखील काका राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या भूमिकेची टिंगल करत आहेत.