आदित्य साहेब पुण्यात आले, फॉर्म भरला आणि भुर्रकन निघून गेले

पुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विशेष हजेरी लावली. उमेदवारी भरण्यासाठी आदित्य येत असल्याने कार्यकर्त्यामध्ये उत्साह पहायला मिळाला. मात्र त्यांनी ना सभेत भाषण केले, ना उमेदवाराच्या रॅलीमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे आदित्य साहेब पुण्यात आले, फॉर्म भरला आणि भुर्रकन निघून गेल्याचं चित्र पहायला मिळालं आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तत्पूर्वी नरपतगिरी चौकामध्ये महायुतीकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, आ बाबुराव पाचर्णे, आ. महेश लांडगे, आ. सुरेश गोरे, जि. प. गटनेत्या आशाताई बुचके, सुलभा उबाळे यांची उपस्थिती होती.

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी केवळ दोन मिनिटं बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या युतीचीचं हवा असून आमचाच विजय होणार आहे. मात्र लोकसभेसाठी शिवसेनेला किती जागा मिळतील हे निश्चितपणे सांगण्यास त्यांनी नकार दिला.