आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर शिवसेनेची नवी भूमिका

aditya thakre

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे येत्या विधानसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाले आहेत. तर आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर आहेत. या यात्रेला जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथून धडाक्यात सुरुवात झाली आहे. खुद्द खासदार संजय राऊत हे आदित्य यांच्यासोबत यात्रेवर आले आहेत. तर या यात्रेवर शिवसेनेने नवीन नारा दिला आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

आता पर्यंत शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले होते. मात्र आता आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी मागणी शिवसैनिकांकडून होत आहे. यात्रे वेळी झालेल्या जाहीर सभेत संजय राऊत यांनी देखील हीच भूमिका मंडळी आहे. ते म्हणाले की, शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाची ही सुरुवात आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जावं. जिकडे आमदार आहेत तिकडे आशीर्वाद आहे आणि जिकडे नाहीय तिकडे आमदार करायला ही यात्रा आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आलो आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी यात्रे निमित्त जमलेल्या समुदायाला संबोधित केले. जनता हीच माझ्यासाठी देव आहे. म्हणूनच मी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. ही कुठल्याही पदासाठी यात्रा नाहीय. मला काही बनायचं म्हणून यात्रा नाहीये. मला महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी यात्रा आहे. नवीन महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्वांची मनं जिंकावी लागतील. अगदी विरोधकांचीसुद्धा जिंकायची आहेत, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.