fbpx

‘शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना आग्रही होती आणि कायम राहणार’

टीम महाराष्ट्र देशा : किती ही काही केले तरी आपल्याला पाणी बनवता येत नाही. त्यामुळे कोणतेही राजकारण न करता सगळ्यांनी एकत्र येवून काम केले पाहिजे, तसेच लोकसभा निवडणुकीत भाजप बरोबर एकत्र येताना आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची अट टाकली होती, असे शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हंटल आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा शुभारंभ रविवारी सोलापुरात करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी सेना आग्रही आहे. कारण लोकसभा निवडणुकीत भाजप बरोबर एकत्र येताना आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची अट टाकली होती. आणि त्यानुसार काम देखील चालू आहे. कर्जमुक्तीमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे सेना सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही आहे. पुढे ठाकरे म्हणाले की, राजकारण न करता दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे.

दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेवर आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज सोलापूर येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला.