भाजपने खालच्या पातळीचे राजकारण करून जागतिक विक्रम केला : आदित्य ठाकरे

thackerY

मुंबई : ठाकरे सरकार विरोधात भाजपने “मेरा आंगण, मेरा रणांगण” असं म्हणत ‘महाराष्ट्र बचाओ’चा नारा दिला आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी मुंबईत भाजप कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन आंदोलन केले.

या भाजपच्या आंदोलनावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. आज एका मोठ्या पक्षाच्या युनिटने खलाच्या पातळीचे राजकारण करून मोठा जागतिक विक्रम केला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात संपूर्ण जग राजकारण, व्यक्तिगत वाद आणि हेवेदावे विसरून एकमेकांना मदत करत आहे. मात्र हा एक असा पक्ष आहे ज्याने राजकारण करत समाजात भीती, द्वेष, आणि दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पक्ष राजकारणासाठी राज्या वर आलेली महामारी विसरला आहे, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे.

तसेच दुसरे अजून एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये आंदोलन करत असलेल्या लहानमुलांचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की, पूर्णपणे लज्जास्पद, सत्तेच्या राजकारणाची लालसा नेत्यांना काय करू शकते. जेव्हा आपल्याला मुलांना सुरक्षित आणि घराच्या आत ठेवण्याची गरज आहे तेव्हा राजकीय निषेधासाठी चेहरा झाकून न घेता, मुलांना उष्णतेत उभे केले आहे. कोरोना को भूल गया, राजकारण प्यारा है।

दरम्यान भाजपने आज संपूर्ण राज्यात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन पुकारले होते. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात हे राज्य सरकार निष्क्रिय ठरलं असून या सरकारला आता जाग आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जनतेने आपल्या घराच्या अंगणात उभं राहुन सरकारच्या निष्क्रियते विरोधात काळे झेंडे, कोणत्याही काळ्या वस्त्राने निषेध व्यक्त करावा, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनावर सडकून टीका केली. तर भाजपनेही आंदोलन करत राज्य सरकारच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले.