मुंबई : शिवसेनेतील आमदार व एकनाथ शिंदे गटातील आमदार पहिल्यांदाच आज विधानसभेत समोरासमोर आले. मागील काही काळापासून विधानसभेचे अध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे आज दोन दिवशीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. हे निवडणूक नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने घेतली गेली. यामध्ये शिंदे-फडणवीस सरकारकडून भाजपचे राहुल नार्वेकर यांचा १६४ मतासह विजय झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. राहुल नार्वेकर हे देशातील सर्वात कमी वयात विधानसभा अध्यक्ष बनले आहेत.
अध्यक्षांच्या निवडीनंतर आमदारांची शुभेच्छापर भाषण झाली. यावेळी महाविकास आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या नेत्यांनी भाजपवर संधी मिळेत त्या ठिकाणी टीका करणं सोडलं नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खुद्द शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आणि भाजपला टोला लगावला. तर भाजपकडूनही पलटवार करण्यात आला.
यानंतर सभागृह बाहेर आल्यावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर प्रसार माध्यमांशी बोलताना भाष्य केले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ” आमच्याशी डोळे भिडविण्याची हिंमत नाही. मतदार संघातील जनतेशी तरी असे करू नका, किती दिवस तुम्ही असे गुवाहाटी गोव्याला फिरणार आहात. अजून किती दिवस हॉटेलमध्ये आणि बसमध्येच बसणार आहात. कधी ना कधी तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील सामान्य जनतेमध्ये जावेच लागणार आहे” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर हल्ला केला आहे.
काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचीही चर्चा
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या निवडीनंतर आमदारांनी शुभेच्छापर भाषणे केली. यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी भाषण करताना एक असा विधान केलं ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसचा शिंदे गटाला पाठिंबा तर नाही ना अशी चर्चा होत आहे. शुभेच्छा पर भाषण करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलेत’ याच वक्तव्यामुळे काँग्रेसने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री मानले की काय? अशीही शंका उपस्थित झाली आहे. कारण भाजपने वेळोवेळी एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हटले आहे. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा मुख्यमंत्री शिवसेनेचा नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<