कॅशलेससाठी सरकार लाँच करतंय नवं अॅप

केंद्र सरकारकडून कॅशलेस इकॉनॉमीच्या दृष्टीने आज एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारकडून आज एक नवं मोबाईल अॅप लाँच केलं जाईल, ज्याद्वारे कुठेही केवळ अंगठा लावून पेमेंट करता येईल. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी ही घोषणा केली.

या अॅपच्या वापरासाठी ग्राहक म्हणून कोणताही फोन वापरण्याची गरज नाही. केवळ तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणं गरजेचं आहे. शिवाय दुकानदाराकडे स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक मशिन असणं गरजेचं आहे. मात्र फिंगरप्रिंट स्कॅनरचा मोबाईल असेल तर बायोमेट्रिकचीही गरज नाही. या अॅपमुळे आता डिजिटल पेमेंटसाठी क्रेडिट, डेबिट कार्डची किंवा ई-वॉलेटची आवश्यकता नसेल. एवढंच नाही तर ग्राहक म्हणून तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल तरीही चालेल.शिवाय कसलाही पिन किंवा ओळख क्रमांक टाकण्याची गरज नसेल.

यूआयडी या आधार कार्ड देणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशात जवळपास सर्व तरुणांकडं आधार कार्ड आहे. यापैकी 40 कोटी आधार कार्ड बँक खात्यांशी जोडलेले आहेत.

तसंच डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजना सुरु केलीये.या योजनेनुसार डिजिटल पेमेंट करणारे ग्राहक आणि व्यापारी यांना कोट्यावधींची बक्षिसं देण्यात येणार आहेत. या योजनेस पात्र होण्यासाठी नागरिकांना 50 रुपयांपासून 3 हजारांपर्यंत डिजिटल खरेदीचे व्यवहार करावे लागणार आहेत.

आजपासून 100 दिवस ही योजना सुरु रहाणार आहे. या योजनेवर सरकार 340 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेनुसार डिजिटल पेमेंट केल्यास दरदिवशी 15 हजार ग्राहकांना 1 हजार रुपयांचं बक्षिस दिलं जाणार आहे. शिवाय योजनेनुसार आठवड्याचा मानकरीही घोषित केला जाणार आहे. त्यात 7 विजेत्यांना 1 लाखांपर्यंतची बक्षिसं मिळणार आहेत.