मनमाड शहरवासियांनसाठी खुशखबर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘या’ योजनेला मान्यता

devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : मनमाड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध नसल्याने सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाययोजना म्हणून करंजवण धरण ते मनमाड शहर थेट पाईपलाईन वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मनमाड नगरपरिषदेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. या योजनेच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.

काल वर्षा निवासस्थानी मनमाड शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार डॉ.भारती पवार, आमदार पंकज भुजबळ उपस्थित होते.

या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत सर्वेक्षण व तांत्रिक छाननी करून प्रारूप प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची अंदाजे किंमत २९७.७७ एवढी असून ही योजना सुरू केल्यानंतर मनमाड नगरपरिषदेने त्यांचे देखभाल दुरुस्ती करावी, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या योजनेसाठी लोकवर्गणीचा हिस्सा म्हणून नगरपरिषदेने दहा कोटींची तरतूद केली आहे. तसेच शहराच्या जवळील ज्या ऑईल कंपन्या आहेत यांच्यात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) उपलब्ध करण्याचा प्रयत्न मनमाड नगरपरिषद करीत आहे. या योजनेमुळे मनमाड शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. यावेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.