अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांमुळे भारताचा पाकिस्तान होईल – प्रकाश आंबेडकर

सांगली: देशातील धार्मिकतेला कोणाचाही विरोध नाही. मात्र या धार्मिकतेआधारे अनियंत्रित व अतिरेक करू पाहणा-या हिंदुत्ववादी संघटनांची वाढती ताकद लक्षात घेता या देशातही हाफिज सय्यद निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यात भारताचा पाकिस्तान होऊ शकतो, असा गर्भित इशारा भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक- अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिला.

‘भीमा- कोरेगाव’ घटनेनंतर प्रथमच सांगली जिल्हा दौर्‍यावर आलेले आंबेडकर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. या पत्रकार बैठकीस विविध दलित संघटनांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंबेडकर यांच्या या दौ-याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्यासमवेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वच शहरात मोठ्या संख्येने झालेल्या मराठा, लिंगायत व बहुजन समाजाच्या मोर्चांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली होती. ही अस्वस्थता संपुष्टात आणून संवादात्मक वातावरण निर्मितीसाठी आपल्यासह माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे- पाटील व पी. बी. सावंत आदींनी पुढाकार घेतला होता.

‘भीमा- कोरेगाव’ येथील घटनेस २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तिथे मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी समाजातील बारा बलुतेदार घटकांशी संवादही साधला होता. त्यामुळेच त्याठिकाणी साडे तीन लाखाहूनही अधिक लोक आले होते. परंतु तिथे घडला प्रकार आपल्याला मान्य आहे. मात्र याचा यल्गार परिषदेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असा खुलासा आंबेडकर यांनी केला. वास्तविक, ‘भीमा- कोरेगाव’ बाहेरील काही शक्तींनी कट आखून हा प्रकार घडवून आणला आहे. भीमा- कोरेगावसह पाच गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. केवळ शिरूर व चाकण या दोन मुख्य मार्गावरच अनुचित प्रकार घडला. या कार्यक्रमास येणा-या वाहनधारकांना अडविण्यात आले, त्यांना बेदम मारहाण करून त्यांची लूट करण्यात आली. इतकेच नाही, तर त्यांच्या वाहनांचीही मोठ्याप्रमाणात मोडतोड केली गेली. या प्रकाराची झळ बसलेले लोक आपापल्या गावी परतले. परंतु ‘महाराष्ट्र बंद’वेळी या सर्वांच्या सहनशक्तीचा अंत झाला व असंतोष उफाळून आल्याने राज्यभर तीव्र पडसाद उमटले.

bagdure

मात्र, या घटनेला सर्वच घटकांनी ‘दलित विरोधात मराठा’ असाच जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. धार्मिक राजकारणाला कोणाचाही विरोध नाही. मात्र या देशातील अनियंत्रित व अतिरेक करू पाहणा-या हिंदुत्त्ववादी संघटनांना वेळीच रोखले गेले पाहिजे. ही बहुजन- दलित समाजालाच नव्हे, तर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठीही धोक्याची सूचना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मर्यादा आहेत, भाजप हा लोकशाहीमुळे नियंत्रित आहे. अनियंत्रित संघटना अतिरेकी होऊ पहात आहेत. त्यातून शेजारील पाकिस्तान या देशाची मोठी कोंडी झाली आहे. अशीच परिस्थिती आपल्या देशातही उद्भवू शकते व त्यामधूनच हाफिज सय्यद निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या अनियंत्रित हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वाढलेल्या दबावामुळेच श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर आजअखेर कोणतीही कारवाई झालेली नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून केंद्र अथवा राज्य शासन किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मत प्रदर्शित केले, तर गुन्हा दाखल केला गेला. मात्र सोशल मिडीयावरून जाहीररित्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांची हत्या करण्याची धमकी देऊनही कारवाई केली जात नाही. एकूणच हिंदुत्त्ववादी संघटनांबाबत केंद्र व राज्य शासनाची भूमिका दुटप्पीपणाची आहे. त्यामुळेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्या अटकेचे धाडस राज्य शासन दाखवित नाही. या राज्यातील पोलिस प्रशासनही आता प्रामाणिक राहिलेले नाही, असा थेट आरोप करून ते म्हणाले, की पोलीस प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी आपल्याजवळ या सरकारविरोधात भूमिका मांडतात. वास्तविक, ज्या पध्दतीने सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधातील आपली घुसमट सर्वसामान्य जनतेसमोर मांडली. त्याच पध्दतीने या पोलिस अधिकार्‍यांनीही या सरकारविरोधातील आपली घुसमट मांडावी, असा सल्ला आपण त्यांना दिला असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

कर्नाटक विधानसभेनंतर मध्यावधी निवडणुकीचा निर्णय येत्या काही दिवसांनी होत असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही आगामी कालावधीत केंद्रात कोणाचे सरकार असणार हे ठरविणारी आहे. कर्नाटक विधानसभा निकालानंतरच लोकसभा- विधानसभा एकत्र घेण्याचा निर्णय कदाचित घेतला जाऊ शकतो. मात्र सध्याची परिस्थिती पाहता निवडणुका या पूर्णपणे भांडवलदारांच्या हाती गेल्या आहेत. मतदान यंत्रात (ईव्हीएम मशिन) तांत्रिक बदल करता येत असल्याने जुन्या पध्दतीने मतपत्रिकेआधारे मतदान प्रक्रियेची मागणी योग्यच आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...