मी विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही, प्रिया बेर्डेंचं स्पष्टीकरण

priya berde

मुंबई : राज्यासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र राजकीय पक्ष मात्र राजकारण करण्यात दंग असल्याचे चित्र आहे. गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी भाजपने काही पक्ष प्रवेश घडवून आणले होते आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष देखील याच मार्गाने जाताना दिसत आहे.

चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.

बेर्डे यांच्या समवेत अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते विनोद खेडकर, लावणीसम्राज्ञी शकुंतलाताई नगरकर, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुहासिनी देशपांडे कार्यकारी निर्माते संतोष साखरे, लेखक दिग्दर्शक अभिनेते डॉक्टर सुधीर निकम, अखिल भारतीय चित्रपट मउहामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, हे सर्वजण राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागांमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.

या प्रवेशाबाबत प्रिया बेर्डे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, ‘पडद्यामागचे कलाकार, तसेच तंत्रज्ञ तसेच अनेक चित्रपट बॅकस्टेज कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी भरीव करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा चित्रपट व सांस्कृतिक विभाग हा उपयुक्त ठरू शकतो,असे मला वाटते. तसेच त्यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवू शकते, असा मला विश्वास आहे.

मात्र असं असले तरीही बेर्डे यांच्या पक्ष प्रवेशामागे वेगळेच राजकारण असल्याची चर्चा आहे. राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये ज्यात साहित्यिक, कलाकार, क्रीडा अशा क्षेत्रातील दिग्गजांना संधी देण्यात येते.सध्या ही निवड प्रक्रिया रखडलेली आहे. राज्यपाल हे नियमांचे काटेकोरपणे पालन करणारे असल्याने उमेदवार देखील योग्यच देण्याचे आव्हान सध्या सत्ताधारी पक्षापुढे आहे.या निमित्ताने प्रिया बेर्डे यांना ही संधी मिळू शकते का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.

या चर्चांवर आता खुद्द प्रिया बेर्डे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेत जाण्यासाठी मी राष्ट्रवादीत प्रवेश करीत नसून लॉकडाऊनच्या काळात पडद्यावरील व पडद्यामागील कलाकारांचे भीषण आयुष्य मी अनुभवत असल्याने या कलाकारांना न्याय देण्यासाठी मी राष्ट्रवादीचे व्यासपीठ निवडले आहे, असे प्रिया बेर्डे म्हणाल्या आहेत.

…तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारेल, नितीन गडकरींनी सांगितली पंचसूत्री

माझे दिवंगत पती लक्ष्मीकांत बेर्डे व माझे माहेर अशा दोन्ही ठिकाणी कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसल्याने मला राजकारणात स्वारस्य नाही. मात्र, माझ्या पक्षप्रवेशाच्या वेळेबाबत अनेक तर्कवितर्क होत असल्याने मी स्पष्ट करु इच्छिते की, मी सुप्रियाताई आणि पवार साहेबांना भेटून जे बोलले ते केवळ चित्रपटसृष्टीतील पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांच्या प्रश्नाला पुढे ठेवून बोलले. अस प्रिया बेर्डे यांनी स्पष्ट केले आहे.

तर, सध्या तर लॉकडाऊनच्या परिस्थितीत दोन्ही पध्दतीच्या कलाकारांचे हाल मी जे अनुभवते ते भीषण आहेत. या सर्वांना न्याय द्यायचा असेल तर आता कुठल्या कुठल्या पक्षाच्या व्यासपीठावर मला यायलाच हवे. हे सर्व मी साहेब आणि ताईंना बोलूनच पक्षप्रवेश करतेय. बाकी पुढे काय-काय माझ्या हातून चांगले होत राहील, त्यानुसार योग्य तो न्याय मिळेल एवढंच, असेही त्या म्हणाल्या.

हिरो सायकलची ‘हिरोपंती’, चिन्यांना दिला जबर दणका