ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर कालवश

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. बालरंगभूमीसाठी चळवळ स्थापन करणाऱ्या सुधा करमरकर यांनी वयाच्या 83 व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ‘लिटील थिएटर’ ही बाल रंगभूमीसाठीची चळवळ सुधा करमरकर यांनी स्थापन केली होती. त्याचप्रमाणे आविष्कार, छबिलदास चळवळीत ही अग्रस्थानी होत्या.

सुधा करमरकर यांचा जन्म मुंबईत 18 मे 1934 साली झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगावातील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाताईंना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू मिळाले होते. वयाच्या 18 व्या वर्षी त्या भरतनाट्यममध्ये पारंगत झाल्यानंतर मो. ग. रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना रंभेचीच भूमिका मिळाली. त्यानंतर त्या नाट्यशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. तिथे जाऊन ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास करुन साहित्य संघाच्या सहकार्याने ‘बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरु केलं. सुधा करमरकरांनी ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील पहिले बालनाट्य सादर केले.

रत्नाकर मतकरी यांनी हे नाटक लिहिले होते. सुधा करमरकर या नाटकाच्या दिग्दर्शिनासह नाटकात चेटकिणीची भूमिकाही साकारली होती. अनुराधा (विकत घेतला न्याय), उमा (थँक यू मिस्टर ग्लॅड), ऊर्मिला (पुत्रकामेष्टी), कुंती (तो राजहंस एक),गीता (तुझे आहे तुजपाशी) ही सुधा करमरकरांची गाजलेल्या भूमिका आणि नाटके असून चिनी बदाम, कळलाव्या कांद्याची कहाणी (नाटककार रत्‍नाकर मतकरी), मधुमंजिरी (नाटककार रत्‍नाकर मतकरी), हं हं आणि हं हं हं (नाटककार दिनकर देशपांडे), गणपती बाप्पा मोरया, अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा (नाटककार), जादूचा वेल (नाटककार सुधा करमरकर), अलीबाबा आणि चाळीस चोर या बालनाटकांचे त्यांनी दिग्दर्शित केले होते.